Header Ads Widget

Responsive Advertisement

लोकप्रश्नांची क्रूर थट्टा !परळी-अंबाजोगाई रस्त्याची झालेली दैना ; लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावरून फसवणूक करण्याचा खेळ आता कुठेतरी थांबला पाहिजे !


---------------------------------------------------
परळी // अंबाजोगाई रस्ता अद्याप झाला नाही
हा मुद्दा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तर गाजलाच परंतु राज्याच्या विधीमंडळात या गोष्टीवर तासंतास चर्चा झाली.  परळी-अंबाजोगाई रस्ता व्हायला लागतो आहे! गेल्या दोन वर्षांपूर्वी सुरू झालेले या रस्त्याचे काम किती झाले? हे मोजायचे असेल तर याला किलोमीटरचे एकक नाही तर फुटांचे एकक लावावे लागेल एवढ्या कासवगतीने हे काम सुरू आहे. उखडून ठेवलेल्या या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांच्या डोळ्यात प्रचंड धूळ, आणि पाठीचे मणके खिळखिळा झाले आहेत. त्या मालिकेत जे व्हायचे ते झाले असेल, त्याहून आपल्याला काही देणेघेणे नाही. परंतु या रस्त्यावरून जी अनेकांची जीवनमालीका चालते ती मात्र बिघडलेली आहे. काम राखडण्यास जे राजकारण कारणीभूत असेल ते करणारांनाच लखलाभ. परंतु त्यामुळे जो हजारो नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जातो आहे ही बाब गंभीर आहे. राजकारणापेक्षा जनतेचे प्रश्न महत्वाचे नाहीत हेच यावरून वारंवार दिसून येत असले तरी जनताही एवढी राजकारणप्रिय झाली आहे की, आपल्या समस्या अबाधित असतांना आगामी निवडणुकीत निवडून कोण येणार? यावर ठिकठिकाणी चर्चा होते. रखडलेल्या रस्त्याची चर्चा निघेल तेवढ्याच काळापुरती पुढाऱ्यांना, सत्ताधाऱ्यांना आणि गुत्तेदारांना शिव्यांची लाखोळी वाहायची, परंतु नेमक्या वेळेला आपले उपसलेले हत्यार म्यान करायचे! यामुळेच "काळ सोकावतो" आहे. पण जनता संवेदनशील आहे म्हणून त्यांच्याही मानसिकतेचा आणि सहनशीलतेचा अंत पाहणे म्हणजे हजारोंच्या भावनांशी खेळ आणि लोकप्रश्नांची क्रूर थट्टा आहे असेच म्हणावे लागेल.

परळी-अंबाजोगाई रस्त्याची झालेली दैना सर्वश्रुत आहे. आता कामाला जोरदार सुरुवात झाली असल्याचे वृत्त ऐकिवात येताच परळीच्या पत्रकार बांधवांनी रस्त्याच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यासाठी घेतला की चुका पुढाऱ्यांच्या असोत की गुत्तेदारांच्या, परंतु जनप्रश्नांवर कितीही लिहून कागद काळे केले तरी सगळ्या गोष्टींना मीडियाच कशी जबाबदार आहे हे सोशल मीडियावर अनेकजण लिहितात. पत्रकारांना आणि माध्यमांना शिव्या घालणे सोपे असले तरी या क्षेत्रात काम करणेही किती अवघड आणि जिकिरीचे असते हे अनुभव घेणारांनाच ठाऊक असते. असो, तर आज परळी अंबाजोगाई रस्त्यावरून खास लोकाग्रहास्तव पत्रकारांनी नजर फिरवली. यावेळी जेष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरांडे आप्पा यांच्या मनात अनेक शंकांनी गोंधळ घातला. परंतु जे काही असेल ते असेल अखेर "उखंड्याची दैना" जात आहे हे काही कमी नाही. आप्पासाहेबांच्या शंका आणि त्यांच्या प्रश्नांपेक्षा रस्त्याचे काम होत आहे हे महत्वाचे आहे. परंतु काम होते आहे हे गेली दोन वर्षे झाली सर्वजण पहात आहेत. लवकरच पूर्ण होणार असं मधेच कोणीतरी उठून म्हणत आणि त्यावरच आशावादी लोकांना किती समाधान मिळतं ही गोष्ट तर अपरंपार आणि आगाधच आहे.

पण लोकांची त्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावरून फसवणूक करण्याचा खेळ आता कुठेतरी थांबला पाहिजे. रस्त्यावरून उडणारी धूळ डोळ्यात जाऊन डोळे खराब होऊ द्या, श्वासनातून जाऊन फुप्पूस निकामी होऊ द्या, बसने आणि वाहनांनी प्रवास करणारांची मणके खिळखिळा होऊ द्या... यापेक्षाही एक गंभीर बाब म्हणजे घाटावरच्या पाहुण्यांनी नव्या सोयरीकींना नकार देणे सुरू केले आहे! ज्या गावाला रस्ता नीट नाही तिथे मुलगी देऊन कोण फसगत करून घेणार आहे? खराब रस्त्यांच्या विळख्यात अडकलेल्या शहराला अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे. नवा पाहुणा या गावाला येणे तर सोडाच पण जे इथले रहिवासी आहेत तेसुद्धा हळूहळू स्थलांतर करू लागले आहेत. प्रत्येक महिन्याला परळीतील तीन ते चार कुटुंब लातूर, अंबाजोगाई, नांदेड, परभणी, मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा ठिकाणी स्थलांतरीत होत आहेत. अशाप्रकारे परिस्थिती कायम राहिली तर प्रभू वैद्यनाथाची परळी बकाल व्हायला वेळ लागणार नाही.

मतांचा जोगवा मागण्याच्या कामात अडथळा येईल हे लक्षात आल्याने काम सुरू केले आहे असे काहींचे म्हणणे आहे. पण मतं मागण्याची वेळ येईपर्यंत हा रस्ता राखडलाच कसा? याचा मात्र कोणी विचार करत नाही. अवघ्या देशात आणि महाराष्ट्रात तर सोडाच पण आपल्या आजूबाजूला सुरू झालेले रस्त्याचे काम सुरूही झाले आणि संपलेही केंव्हाच. परंतु परळी-अंबाजोगाई रस्ता कधी संपणार हे एक गूढच आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्र्याला सुद्धा हतबल आणि हताश होण्याची वेळ या रस्त्यामुळे आली. नितीन गडकरीजींनीही तसे बोलून दाखवले आहे. अनेक वेळा लोकांनी रोष व्यक्त केला, आंदोलने केली परंतु उत्तर देण्यासारखे कोणाकडेच काही नाही. असो, जे असेल ते असेल... ज्यांच्याकडे या कामाची चावी आहे त्यांनी ती फिरवावी आणि कामाला गती देऊन लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे एवढीच या रखडलेल्या कामामुळे त्रस्त झालेल्या हजारो लोकांच्या वतीने विनंती.
---------------------------------------------------
दत्तात्रय काळे
परळी वैजनाथ
---------------------------------------------------
टीप : लोकप्रश्नाची कदर असेल तर या लेखाचा अन्वयार्थ लावून कोणीही जाळून घेऊ नये, राजकीय अर्थ तर लावूच नये.

Post a Comment

0 Comments