गेवराई // आज शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास गेवराई तालुक्यातील गढी जवळ राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला व्यायाम करत असलेल्या तीन शालेय विद्यार्थ्यांना अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली. या अपघातात तिन्ही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. हे तीनही शालेय विद्यार्थी गेवराई तालुक्यातील तळेवाडी येथील आहेत. भविष्यात सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याच्या हेतूने हे तिघेही नियमित व्यायाम करत होते अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
सुनिल प्रकाश थोटे (वय १४), तुकाराम विठ्ठल यमगर (वय १६) व अभिषेक भगवान जाधव (वय १४) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे तिघेही गेवराई तालुक्यातील तळेवाडी येथील राहणार असून अभिषेक आणि सुनील एकाच वर्गात होते तर तुकाराम त्यांच्यापेक्षा मोठा होता. ते शनिवारी पहाटे गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या कल्याण -विशाखापट्टणम या महामार्गावर व्यायाम करण्यासाठी गेले होते. याच दरम्यान गढीकडून माजलगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने या तिघांनाही पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये तिघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांसह ट्राफिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान या घटनेने तळेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. तळेवाडी गावातील काही तरुण सैन्यात भरती आहेत. ते सुट्ट्यात गावी आले असता हे तिघेही त्यांना आम्हाला सैन्यात भरती व्हायचे आहे, देशसेवा करयाची आहे असे म्हणत. यासाठीच ते व्यायामाचा नियमित सराव करत होते अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
▪ रस्त्यावर व्यायाम करणे धोकादायक :
पहाटेच्या सुमारास अनेक तरुण रस्त्यावर व्यायाम करताना दिसून येतात. कधी रस्त्याच्या बाजूने, रस्त्यात किंवा वळणावर तरुणांचा रस्त्यावर झोपून व्यायाम सुरु असतो. अंधारात असे तरुण वाहन चालकांच्या नजरेस न आल्याने अपघाताची शक्यता बळावते. त्यातच रात्रभर प्रवास केलेले वाहनचालक पहाटेच्या वेळेला अर्धवट झोपेच्या अमलाखाली असतात. तसेच सध्या बहुतांशी रस्ते चांगले झाल्याने वाहने भरधाव वेगात आहेत. त्यामुळे रस्त्यावर व्यायाम करणे धोक्याचे ठरत आहे.
@ विवेक सिंधु न्यूज



0 Comments