Header Ads Widget

Responsive Advertisement

माणुसकीला काळिमा फासणारी घटना ! 'त्या’ अर्भकाचा मृतदेहच उलगडणार त्याच्या खून मागील सत्य..!



 अंबाजोगाई //  लातूर तालुक्यात औसा येथे तंत्रनिकेतनचे शिक्षण घेत असलेल्या अंबाजोगाई तालुक्यातील युवतीवर अज्ञात तरुणांनी अत्याचार केला. अत्याचारातून गर्भवती राहिलेल्या युवतीस स्त्री जातीचे मृत अर्भक जन्मले. दरम्यान, औसा पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर अंबाजोगाई तालुक्यात बर्दापूर हद्दीत दफनविधी झालेल्या या अर्भकाचा मृतदेह दोन दिवसानंतर नायब तहसीलदार आणि पोलिसांच्या उपस्थितीत पुन्हा बाहेर काढून त्याचा डीएनए नमुना घेण्यात आला. डीएनए अहवालानंतर या प्रकरणाचे गूढ उलगडण्यास मदत होणार आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंबाजोगाई तालुक्यातील २० वर्षीय अविवाहित युवती लातूर जिल्ह्यातील औसा येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत आहे. सात महिन्यापूर्वी महाविद्यालयात जात असताना अनोळखी दोघा तरुणांनी रस्ता अडवला आणि तोंडावर फडके झाकून तिच्यावर अत्याचार केला अशी तक्रार तिने औसा पोलिसात दिली. तिच्या तक्रारीवरून दोन अज्ञात आरोपींवर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेतून पीडिता गर्भवती राहिली होती. सातव्या महिन्यातच तिने लातूरच्या शासकीय रुग्णालयात स्त्री जातीच्या अर्भकाला जन्म दिला. दुर्दैवाने हे अर्भक मृत जन्मले. अर्भकाच्या मृत्यूचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर पिडीतेने अर्भकाला अंबाजोगाई तालुक्यातील स्वतःच्या गावात आणून दफन केले. या दरम्यान औसा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. एकूणच प्रकरण संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी अर्भकाचा डीएनए नमुना तपासणीसाठी पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बर्दापूर पोलिसांच्या सहकार्याने आणि अंबाजोगाईच्या नायब तहसीलदार स्मिता बाहेती यांच्या उपस्थितीत दोन दिवसानंतर अर्भकाचा पुरलेला मृतदेह बाहेर काढून डीएनए नमूना घेण्यात आला. यावेळी पीडिता आणि तिचे आई-वडील देखील उपस्थित होते.

▪ डीएनए अहवालातून रहस्य उलगडणार?

मागील आठवड्यात अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील डॉक्टरांनी अर्भकाचा डीएनए नमुना घेऊन तपासणीसाठी मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठवून दिला आहे. साधारणपणे तीन महिन्यात अहवाल येण्याची शक्यता असून त्यातून अत्याचारी कोण हे निष्पन्न होण्यास मदत होणार आहे.

▪ अत्याचार झाल्याची शक्यता कमीच : औसा पोलीस ..........

पिडीता लातूर येथील शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी गेली होती. आपल्यावर अत्याचार झाल्याचे त्यावेळी तिने रुग्णालयात सांगितले होते. त्यानंतर आमच्याकडे गुन्हा नोंदविण्यात आला. परंतु, त्या युवतीवर अत्याचार झाला नसून तिच्या सहमतीनेच झालेल्या संबंधातून ती गर्भवती झाली असावी असा आम्हाला संशय आहे आणि त्या दृष्टीनेच आमचा तपास सुरु आहे. त्यामुळे डीएनए अहवालाची आम्हाला तपासकामी मदत होणार आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील सत्य बाहेर येईल असे औसा पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक कदम हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments