बीड // बीड लोकसभेसाठी मतदान १८ एप्रिल रोजी होणार आहे. १८ एप्रिलच्या अगोदर १७ व १९ एप्रिल अशा दोन दिवस सुट्टया आल्याने मतदानाचा दिवस धरून सलग तीन सु्ट्टया येतात. या सुट्टयात मतदार मतदानासाठी राहतो का सहलीवर जातो? अशा स्थितीमुळे मतदानाचा टक्का घसरणार की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.
बीड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी १८ एप्रिल गुरूवार रोजी मतदान होणार आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर सलग तीन दिवस सुट्ट्या आल्या आहेत. सतरा एप्रिल बुधवारी महवीर जयंतीची सुटी आहे. १८ एप्रिल गुरुवारी मतदानामुळे सुट्टी जाहिर होईल तर १९ एप्रिल शुक्रवार रोजी गुडफ्रायडे सुट्टी आहे. अशा सलग तीन दिवस सुट्टया आल्या आहेत.
१९ एप्रिल शुक्रवारी गुडफ्रायडेसोबतच या दिवशी चैत्र पौर्णिमा व हनुमान जयंतीचा उत्सव आहे. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी हनुमान मंदिरे आहेत. त्या ठिकाणी हनुमान जयंतीच्या निमित्ताने मोठी यात्र भरते. तर ग्रामदैवत असलेल्या देवी, दुर्गा मातेच्या गावोगावच्या यात्राही चैत्र पौर्णिमेच्या मुहुर्तावरच असतात. या शिवाय चैत्र पौर्णिमेला येडेश्वरीच्या यात्रेला जाणाऱ्या या आराधी महिलांची मोठी संख्या असते. मोठी यात्रा भरत असल्याने या यात्रेसाठी एक दोन दिवस अगोदरच जाण्याची प्रथा आहे. तसेच चैत्र पौर्णिमेला सलग सुट्ट्या आल्याने तुळजापूरवारी करणारांची मोठी संख्या आहे. ग्रामीण भागात असणारे अनेक अखंड हरिनाम सप्ताहची सुरुवात चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने होते. अशा स्थितीत या सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांचा फायदा उठवणारे अनेकजण असतात. याचा फटका मतदानावर होतो की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.
▪ शनिवारीची रजा टाकली तर मिळतील सलग पाच दिवस सुट्ट्या :
१७ एप्रिल ते २१ एप्रिल अशा पाच दिवसाच्या कालावधीत फक्त शनिवार हा कामाचा दिवस आहे. २० एप्रिल शनिवारची रजा टाकली तर सलग पाच दिवसाच्या सुट्ट्या उपलब्ध होतात. या पाच दिवसाच्या सुट्टीत एखादा मोठा टूर निघू शकतो. अशी शक्कल अनेकांनी लढविली आहे.
===========================
अधिक बातम्यांसाठी वाचा ‘विवेक सिंधु’



0 Comments