अंबाजोगाई // शहरालगतच्या मोरेवाडी परिसरातील जयभीम नगर येथील शिक्षक दांपत्याचे घर भरदिवसा फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा जवळपास पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली.
सातपुते वस्ती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक सचिन नारायण गायकवाड यांचे मोरेवाडी परिसरातील जयभीम नगर मध्ये घर आहे. शुक्रवारी सकाळी ९.३० गायकवाड दांपत्य घराला कुलूप लावून शाळेसाठी निघून गेले. त्यानंतर दुपारी १२ ते ५ वाजताच्या दरम्यान कधीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांनतर बेडरूम मधील कपाट उघडून त्यांनी आत ठेवलेले सोन्याचे नेकलेस, अंगठी, टॉप्स, बाली, डूल, मणी, नाथ आदी १ लाख ३८ हजार ३९२ रुपयांचे दागिने आणि रोख २८ हजार रुपये असा एकूण १ लाख ६६ हजार ३९२ रुपयांचा ऐवज लंपास केला. सायंकाळी ५ गायकवाड दांपत्य शाळेतून परतल्यावर त्यांना दरवाजाला कुलूप नसून फक्त कडी लावल्याचे दिसून आले. त्यामुळे संशय आल्याने त्यांनी दरवाजा उघडून पहिले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी सचिन गायकवाड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलीस जमादार सोळंके करत आहेत.


0 Comments