Header Ads Widget

Responsive Advertisement

रद्दीवाल्याच्या रद्दीत सापडले अस्सलं सोने !!



अनुष्कानेअभियांत्रिकीच्या परीक्षेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात प्रथम येत सुवर्ण पदकाला गवसणी घातली ;

वडिलांनी आणलेल्या रद्दीतील पुस्तके वाचून शिक्षण केले पूर्ण



अंबाजोगाई //  रद्दीतील पुस्तकावर केले शिक्षण ,अनुष्काचे वडील भंगार व रद्दी खरेदी करीत असतांना लोक जुनी पुस्तके आणि अर्धवट वापर केलेल्या वह्या विकत असत. त्यांची  रद्दीवर विक्री न करता आपल्या मुलीला ते दाखवत असत. त्यातील उपयोगी पुस्तके व अर्धवट वह्या यांचा वापर करुन अनुष्का व अमीषा या भगिनींनी आपले शिक्षण पुर्ण केले आहे. अमीषा ही मेडीलकलची तयारी करीत असून तिलाही आपल्या यशाची खात्री आहे. घरात पाचवीला पुजलेले दारिद्र्य.. वडील रद्दी आणि भंगार गोळा करून संसाराचा गाडा हाकतात तर आणि मुकबधीर.. घरात शिक्षणाचा कसलाही गंध नाही. अश्या अनंत अडचणी बाजूला सरत रद्दीवाल्याच्या घरातील अस्सल सोने लख्ख उजळले आहे! या घरातील लेकीने अभियांत्रिकीच्या विद्युत शाखेतून विद्यापीठातून प्रथम येत सुवर्णपदक मिळविले आहे.

अनुष्का दामोदर सोनवणे असे या गुणवान लेकीचे नाव आहे. अंबाजोगाई शहरातील बोधीघाट परिसरात ती राहते. अनुष्काचे वडील दामोदर हे हातगाडा चालवून भंगार व रद्दी गोळा करण्याचे काम करतात. त्यांची पत्नी संगीता या मुकबधिर आहेत. या दांपत्याला अनुष्का व अमिषा या दोन मुली असून त्यांना मुलगा नाही. काम केले तरच दिवस भागणार अश्या अवस्थेत या कुटुंबाने दिवस काढले आहेत. गरिबीमुळे आपल्याला शिक्षण घेता आले नाही याची कसर आपल्या मुलीला शिक्षण देऊन काढण्याच्या हेतूने हे दांपत्याने अपार कष्ट घेतले, आजही सोसत आहेत. कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी दामोदर यांनी काही काळ सायकलरिक्षा चालवला. परंतु, त्या काळी बाजारात ऑटोरिक्षा आल्याने त्यांच्या सायकल रिक्षाला प्रवाशी मिळेना झाले. त्यामुळे त्यांनी हातगाड्यावर भंगार व रद्दी गोळा करण्याचा व्यवसाय सुरु केला. मुकबधीर असलेली त्यांची पत्नी शिलाईकाम करून कुटूंबाला जमेल तेवढा आर्थिक हातभार लावू लागली. या सर्व कष्टाच्या पैश्यातून दामोदर यांनी आपल्या मुलींना शिकवले. अनुष्काचे चौथीपर्यंतचे शिक्षण बोधीघाट येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत झाले. तर, माध्यमिक शिक्षण वेणुताई माध्यमिक विद्यालयात, बारावीचे शिक्षण योगेश्वरी महाविद्यालयात आणि अभियांत्रिकीचे शिक्षण बसवेश्वर महाविद्यालयात झाले. गरिबीमुळे घरात कोणत्याही सुविधा नसताना आणि कसलीही खाजगी शिकवणी लावू न शकलेल्या अनुष्काने पहिलीच्या वर्गापासूनच पहिला क्रमांक कधीच सोडला नाही. तीच जिद्द आणि चिकाटी कायम ठेवत तिने अभियांत्रिकीच्या परीक्षेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात प्रथम येत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. अनुष्काच्या नेत्रदीपक यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.                     
▪ “आई-वडीलांचा आशीर्वाद,  प्रामाणिक प्रयत्न, शिकण्याची इच्छा व जिद्द असेल तर आपली गरीबी शिक्षणात अडसर ठरत नाही. आपल्या गरीबीचा मुद्दा पुढे करुन विद्यार्थ्यांनी शिक्षणापासून दुरु जाऊ नये. प्रयत्नांवर विश्वास ठेवा, यश नक्की मिळेल.”
- अनुष्का सोनवणे (विद्यापीठाचे 'स्वातंत्र्य सैनिक आनंदराव देशमुख सुवर्णपदक' विजेती)

▪ गुणवान लेकींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज :
अनुष्काला अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेण्याची इच्छा आहे. अमिषा देखील मेडिकलची तयारी करत आहे. परंतु, या दोघींचाही शिक्षणाचा खर्च आता वाढला आहे. वडिलांनाही वयोमानापनुसार आता पहिल्यासारखे काम होत नाही. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी पुढे येत या लेकीच्या शिक्षणासाठी हातभार लावावा अशी अपेक्षा या भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments