Header Ads Widget

Responsive Advertisement

लग्नात फोटोचा आग्रह महागात पडला , पर्स मधील आठ लाख रु गेले चोरीला .



पुणे // लग्नसमारंभात नातेवाईकांनी फोटो काढण्याचा आग्रह केल्याने त्यांनी बाकावर आपली पर्स ठेवली व त्या स्टेजवर गेल्या. फोटो काढल्यानंतर त्या पुन्हा आपल्या जागी परत आल्या तर, तेथे पर्स नव्हती. एक फोटो त्यांना तब्बल पावणे आठ लाख रुपयांना पडला. ही घटना कासारवाडी येथील गंधर्व रीमा लॉन्स येथे बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी रामचंद्र गणपतराव झरकर (वय ५९, रा. लक्ष्मी निवास अपार्टमेंट, सदाशिव पेठ) यांनी भोसरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. झरकर हे आपल्या पत्नीसह कासारवाडी येथील गंधर्व रीमा लॉन्स येथे बुधवारी लग्नाला गेले होते. लग्न झाल्यानंतर जेवणावरुन ते तेथे बसले होते. त्यावेळी नातेवाईकांनी त्यांना फोटो काढण्यासाठी स्टेजवर बोलावले. तेव्हा त्यांच्या पत्नीने आपल्या हातातील पर्स तेथेच बाकावर ठेवली व त्या फोटो काढायला स्टेजवर गेल्या. फोटो काढून त्या परत आल्यावर त्यांना बाकावर पर्स आढळून आली नाही. त्यांनी सर्व ठिकाणी शोध घेतल्यावरही ती मिळाली नाही. शेवटी त्यांनी भोसरी पोलिसांकडे धाव घेतली.

या पर्समध्ये ४ तोळ्याचा नेकलेस, ६ तोळ्याचा नेकलेस, १० तोळ्याचा चेन हार, ३़५ तोळयाचे बाजू बंध, ४१ ग्रॅमचे गंठण, दीड तोळयाची कर्णफुले, दोन मोबाईल असा ७ लाख ७७ हजार ३०० रुपयांचा ऐवज होता. या लॉन्समध्ये सीसीटीव्ही दिसून आले नाही. त्यामुळे पोलिसांनी लग्न समारंभात काढलेले फोटो, व्हिडिओ शुटींगच्या सहाय्याने तपास सुरु केला आहे.

Post a Comment

0 Comments