Header Ads Widget

Responsive Advertisement

अंबाजोगाई बुट्टेनाथ परिसरात बिबट्या पुन्हा अवतरला....?




▪ दोन जनावरांचा पाडला फडशा; स्थानिकात भीतीचे वातावरण

अंबाजोगाई // शहरालगत असलेल्या बुट्टेनाथ आणि डोंगर तुकाई परिसरात बिबट्या पुन्हा अवतरला असून मागील आठवड्यात दोन जनावरांचा फडशा पडल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली असून स्थानिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

अंबाजोगाई शेजारील मुकुंदराज, बुट्टेनाथ, वाघदरा, डोंगर तुकाई भागात घनदाट झाडी असल्याने यापूर्वी देखील येथे बिबट्याचा वावर पहावयास मिळाला आहे. आतापर्यंत बिबट्याने अनेक जनावरांचा फडशा पाडला आहे. मागील वर्षी कुरणवाडी परिसरात बिबट्याचे अखेरचे दर्शन झाले होते. त्यांनतर बिबट्या अदृश्य झाला होता आणि त्यामुळे परिसरातील नागरिकही निर्धास्त झाले होते. मात्र, मागील आठवड्यात बिबट्या पुन्हा प्रकटला. दि. ७ नोव्हेंबर रोजी बिबट्याने उस्मान मुन्निवाले यांच्या २ वर्षीय वासराचा आणि दि. ९ नोव्हेंबर रोजी शेख नसीर यांच्या अडीच वर्षीय वासराचा बिबट्याने फडशा पाडला. दोन्ही शेतकऱ्यांनी याबाबत वनविभागाकडे तक्रार केल्यानंतर वनपरिमंडळ अधिकारी शंकर वरवडे, माऊली हेडे यांनी वनमजुरांसह घटनास्थळी भेट दिली. डॉ. केंद्रे यांनी दोन्ही वासरांचे शवविच्छेदन केले असून त्याचा अहवाला वनविभागाकडे दिला आहे. वनअधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली असता त्यांना बिबट्या सदृश्य प्राण्याच्या पायाचे ठसे मिळून आले आहेत. यामुळे परिसरातील शेतकर्‍यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भागात अनेकांनी या बिबट्याला मुक्त संचार करताना पाहिले असून हा बिबट्या बाराखंबी मंदिरापर्यंत येत असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे वनविभागाने तत्काळ येथे पिंजरा लावून या बिबटयाला जेरबंद करण्याची मागणी येथील शेतकरी करत आहेत. तसेच, मृत जनावरांची नुकसानभरपाई देण्याची मागणी दोन्ही शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.

▪ नागरिकांनी काळजी घ्यावी :
"सध्या ऊसाच्या फडात रानडुकरांचा वावर असल्याने त्यांची शिकारी करण्यासाठी बिबट्यासदृश्य प्राणी आला असावा. रानडुक्क न मिळाल्याने त्याने या ठिकाणी निर्मनुष्य गोठ्यातील बांधलेल्या वासरांना लक्ष केले असावे. सध्यातरी नागरिकांनी या भागात फिरताना एकटे फिरू नये. बिबट्या सहसा मानवी वस्तीकडे फिरकत नाही, त्यामुळे तो शहरात येण्याची शक्यता कमीच आहे."
- शंकर वरवडे, वन परिमंडळ अधिकारी

ताज्या आणि जलद बातम्यांसाठी डाऊनलोड करा ‘विवेक सिंधु’चे मोबाईल ॲप्लिकेशन

https://goo.gl/rMyNyP

Post a Comment

0 Comments