पुणे// महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना युवकांना प्रेरणा देणारी आहे. या योजनेंतर्गत विविध प्रकारचे प्रशिक्षण घेतल्यानंतर युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्याबरोबरच त्यांना रोजगार उपलब्ध होऊन आर्थिकदृष्टया सक्षम बनविण्यात ही योजना महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास ग्रामविकास तथा महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
पुणे जिल्हा परिषद येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेचे उद्घाटन तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग युथ लीडरशिप प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, जिल्हा परिषदेच्या सदस्या आशा बुचके, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिनेश डोके, आर्ट ऑफ लिव्हिंग चे शेखर मुंदडा, अमोल येवले, सारंग जगताप, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना आणि आर्ट ऑफ लिव्हिंग या सामाजिक संस्थेमध्ये सामंजस्य करार झाला. यावेळी प्रशिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात श्रीमती मुंडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी श्रीमती मुंडे म्हणाल्या, युवक- युवतींसाठी दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना प्रोत्साहन देणारी आहे. गुणवत्ता असूनही पैशाअभावी पुरेसे शिक्षण घेवू न शकणाऱ्या तरुणांना अल्पमुदतीचे प्रशिक्षण देवून त्यांना संबंधीत संस्थेमार्फत रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामुळे या तरुणांना हालाखीच्या परिस्थितीत कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यास मदत होणार आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी भौतिक विकास, शैक्षणिक विकासाबरोबरच मानसिक विकासही महत्वाचा आहे. हा विचार करुन या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेव्दारे व्यक्तिमत्व विकासाचे धडेही दिले जाणार आहेत, असे सांगून श्रीमती मुंडे म्हणाल्या, स्वत:च्या घरच्या गरीब परिस्थितीला लाजू नका, आई वडिलांचा अभिमान बाळगा, स्वत: अपार कष्ट करुन जिद्दीने परिस्थितीला सामोरे जा, आत्मसन्मान बाळगा, जबाबदारीचं भान ठेवा, व्यसनमुक्त जीवन जगा, समाजाप्रती संवेदनशील रहा. त्याचबरोबर जीवनात ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी परिश्रम करा आणि ते ध्येय पूर्ण करा, असा मौलिक संदेश त्यांनी उपस्थित तरुण-तरुणींना दिला.
श्रीदेवकाते म्हणाले, आपले मन स्थिर असेल तर आपल्या हातून उत्कृष्ट काम होते. विद्यार्थ्यांनी या दोन संस्थेच्या माध्यमातून आपला विकास साधावा.
श्रीमती आर. विमला म्हणाल्या, शिक्षण घेत असताना केवळ शैक्षणिक पदव्या संपादन न करता अधिकाधिक ज्ञान संपादन करा. तसेच आत्मपरिक्षण करा, स्वत:च्या अंगचे कौशल्य व आवड ओळखून प्रशिक्षण घ्या, योग्य संधीचा लाभ घ्या.
यावेळी मान्यवरांनी तसेच प्रशिक्षणार्थींनी मनोगत व्यक्त केले. दिनेश डोके यांनी आभार मानले.


0 Comments