Header Ads Widget

Responsive Advertisement

दहावीतील वर्गमिञांने केला मिञाचा खून ....

.....
▪ खाजगी वसतिगृहात किरकोळ भांडणातून केला खून

अंबाजोगाई : येथील नागझरी परिसरातील अमृतेश्वर नगरात एका खाजगी वसतिगृहात राहणाऱ्या दोघा विद्यार्थ्यातील किरकोळ वादातून एकाचा खून झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणातील दोन्ही मुले दहावीचे विद्यार्थी असून अवघे १५ वर्षे वयाचे आहेत. या घटनेनंतर अल्पवयीन आरोपीने अंबाजोगाई शहरातून पळ काढला.

दत्ता अशोक हजारे (वय १५, रा. पोळ पिंपरी, ता. परळी) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो बर्दापूर येथील रेणूक विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत होता. दत्ताचे वडील शेतमजूर असून त्यांना दोन मुली आणि एकुलता एक मुलगा होता. खाजगी शिकवणी आणि शालेय शिक्षणासाठी दत्ताला वडिलांनी अंबाजोगाई येथील राजमाता गुरुकुल या खाजगी वसतिगृहात राहण्यासाठी ठेवले होते. हे वसतिगृह अमृतेश्वर नगरातील राजू वैजनाथ लोखंडे यांच्या जागेमध्ये  असून नारायण सुनील वाघमोडे हे वसतिगृह चालक आहेत. या वसतिगृहात दत्ता सोबत आणखी एक दहावीचा विद्यार्थी राहत होता. मंगळवारी सकाळी दत्ता आणि त्या विद्यार्थ्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर दोघेही शाळेत प्रथम सत्र परीक्षा आटोपून वसतिगृहात परतले. त्यानंतर दत्ता हजारे वसतिगृहाच्या छतावर अभ्यास करत बसला होता. दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास तो विद्यार्थी दत्ता जवळ आला आणि सकाळच्या भांडणाचा राग मनात धरून त्याच्या डोक्यात कोणती तरी जड वस्तू मारली. हा घाव वर्मी बसल्याने दत्ताचा जागीच मृत्यू झाला. दत्ता निपचित पडल्याचे पाहून त्या विद्यार्थ्याने घटनास्थळाहून पळ काढला. त्यानंतर इतर विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केल्याने वसतिगृह चालकाने छतावर येऊन पहिले असता त्याला दत्ताचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. या घटनेची खबर मिळताच अंबाजोगाई पोलिसांनी घटनास्थळी पोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवून दिला. मयत दत्ता हजारे याच्या वडिलांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी अंबाजोगाईकडे धाव घेतली आणि एकुलत्या एक मुलाचे कलेवर पाहून हंबरडा फोडला. दरम्यान, या घटनेमुळे अंबाजोगाई शहरातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.▪ खाजगी वसतिगृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरया घटनेने खाजगी वसतिगृहांची बजबजपुरी, त्यातून मिळणाऱ्या त्रोटक सुविधा आणि मुख्यत्वे सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. एका-एका खोलीत अक्षरशः कोंबून विद्यार्थी भरलेले असतात. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक वसतिगृहातून पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसते. तसेच, या खाजगी वस्तीगृहांवर कोणाचेही नियंत्रण नाही अथवा त्यांची तपासणी देखील होत नाही. अनेक वसतिगृहातून विद्यार्थ्यांच्या छळाच्या घटनाही यापूर्वी समोर आलेल्या आहेत

वरिष्ठ अधिकारी तत्काळ घटनास्थळी :
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, सहा. पोलीस अधीक्षक सुरेश गायकवाड, पोलीस निरीक्षक सोमनाथ गीते, सहा. पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही विद्यार्थ्यातील भांडणाचे नेमके कारण काय आणि इतर बाबींचा तपास पोलीस करत असून फरार अल्पवयीन आरोपीचाही शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.


Post a Comment

0 Comments