समांतर उड्डाणपूलाची आणखी किती प्रतिक्षा करावी लागेल
परळी वैजनाथ // शहरात येणारी वाहतूक व वाढती व्याप्ती लक्षात घेऊन या उड्डाणपूलाला आणखी एक समांतर उड्डाणपूलाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यातआलेली आहे. लवकरच असा समांतर उड्डाणपूल निर्मिती सुरू होईल असा पालकमंत्र्यांनी मोठा गाजावाजा केला पण पुढे याचे काय झाले? हा प्रश्न कायमच आहे.काल उड्डाणपूलावर आणखी एका युवकाचा बळी गेला असून अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळे पुन्हा एकदा वाढती वाहतूक व समांतर उड्डाणपूलाचा मुद्दा पुढे आला आहे. गाजावाजा केलेल्या समांतर उड्डाणपूलाची आणखी किती प्रतिक्षा करावी लागेल असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी उपस्थित केला आहे.
बीड आणि गंगाखेड रस्त्यास जोडणाऱ्या डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाण पूल परळीची वाढती लोकसंख्या आणि बाहेर गावावरून येणारी वाहतुकीला कमी पडत आहे. डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाण पुलावर सततची वाहतुक कोंडी हा नित्याचाच बनलेला विषय आहे. शहरातला उड्डाण पूल वाहतुकीसाठी अपुरा पडत असल्याने एखादे वाहन जरी बंद पडले तरी त्याचा वाहतुकीवर परिणाम होतो हे नेहमी अनुभवाला येणारे चित्र असते. या उड्डाणपूलाने या अगोदर अनेक बळी घेतले आहेत. काल दि.२१ रोजी आणखी एक दुर्दैवी घटना घडली .
भार पेलण्याच्या क्षमतेपेक्षा अधिकचा अधिभार हा पुल पेलतो. मोठी दुर्घटना होवू शकते हा धोका लक्षात घेऊन या पुलाचे बांधकाम लेखापरीक्षण ( स्ट्रक्चरल आॅडीट करावे अशी मागणी बाजीराव धर्माधिकारी यांनी केली आहे.
परळी येथे समांतर रेल्वे उड्डाणपूलासाठी तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.असा मोठा गाजावाजा पालकमंत्र्यांनी केला होता. लवकरच काम सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र याचे पुढे काय झाले ते अद्यापही गुलदस्त्यातच आहे. आणखी किती प्रतिक्षा करावी लागेल हा प्रश्न कायमच आहे असा सवाल उपस्थित करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येईल असा इशारा बाजीराव धर्माधिकारी यांनी दिला आहे.


0 Comments