सततच्या दादागिरीला कंटाळून त्याने मित्राच्या डोक्यात दगड मारला..
अंबाजोगाई // ‘तो सतत दादागिरी आणि दमदाटी करायचा. मला आणि याच वसतिगृहात राहणाऱ्या माझ्या लहान भावालाही मारहाण करायचा. त्याने घरातील माझ्या व्यक्तींनाही मारहाण करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे चिडून मी त्याच्या पाठीवर दगड मारला पण तो त्याच्या डोक्यात लागला’ असे दत्ता हजारे खून प्रकरणातील अल्पवयीन आरोपीने सांगितले. बुधवारी सकाळी परीक्षा देण्यासाठी तो मुकुंदराज शाळेच्या परिसरात आला असता पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.
अंबाजोगाई येथे मंगळवारी दुपारी दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या दत्ता अशोक हजारे या विद्यार्थ्याचा राजमाता वसतिगृहात त्याच्या सोबत्याने खून केला होता. शाळकरी अल्पवयीन मुलांच्या वादाला मिळालेले गंभीर वळण पाहून शहरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी रात्री उशिरा अशोक हजारे यांच्या फिर्यादीवरून १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. याचा तपास सहा. पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, अल्पवयीन आरोपीच्या शोधात पोलिसांचे एक पथक कालपासून फिरत होते. रात्रभर तो स्वाराती रुग्णालयाच्या रिसरात दडी मारून बसला. त्यानंतर बुधवारी सकाळी परीक्षा देण्यासाठी तो मुकुंदराज शाळेजवळ आला होता. यावेळी पोलीस कर्मचारी भालेराव आणि नागरगोजे यांनी त्याला ताब्यात घेतले. दत्ताची सततची दादागिरी आणि दमदाटीला कंटाळूनच त्याच्या पाठीत दगड मारला परंतु तो त्याच्या डोक्यात लागला. दत्ता आडवा पडल्याने नंतर तो दगड नालीत फेकून मी तिथून पळ काढला असे या अल्पवयीन आरोपीने सांगितले. पकडला जाईपर्यंत दत्ताच्या मृत्यूबद्दल हा आरोपी पूर्णपणे अनभिज्ञ होता असे समजते. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, मयत दत्ता हजारे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन बुधवारी सकाळी स्वाराती रुग्णालयात करण्यात आले.



0 Comments