Header Ads Widget

Responsive Advertisement

बँड पार्टीच्या पीकअपला लक्झरीची धडक बसल्याने भीषण अपघात


यादुर्दैवी घटनेने 19 ते  28 वयोगटातील चार महिलांचे कुंकू पुसले गेले तर चार चिमुकल्यांचे पितृछत्र हरविले

शिरपूर \वाशिम // लोणार जि. बुलडाणा येथील रविवार 23 सप्टेंबर पहाटे  झालेल्या अपघातात भर जहागीर येथील तीन तर शिरपूर येथील दोन जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने 19 ते  28 वयोगटातील चार महिलांचे कुंकू पुसले गेले तर चार चिमुकल्यांचे पितृछत्र हरविले आहे.

सिंदखेडराजा जि. बुलडाणा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत वाद्य वाजविण्यासाठी जात असलेल्या  बँड पार्टीच्या वाहनाला ब्राम्हण चिकना (ता. लोणार) गावाजवळ लक्झरी वाहनाची धडक बसल्याने भीषण अपघात झाला. बँड पार्टीच्या पीकअप वाहनात भर जहागीर व शिरपूर येथील एकूण 13 ते 14 जण होते.  यापैकी ज्ञानेश्वर वामन डोंगरे (19), चालक अरूण संजय कांबळे (22),  राजू भगवान कांबळे (23) सर्व रा. भरजहागीर तसेच प्रवीण दशरथ कांबळे (25) व गणेश सदाशीव बांगरे (32) सर्व रा. शिरपूर असे पाच जण ठार झाले.

मृतक ज्ञानेश्वर डोंगरे याच्या कुटुंबात केवळ आई असून, ज्ञानेश्वर हाच आईचा आधारवड होता. ज्ञानेश्वरच्या अपघाती निधनाने आई पोरकी झाली असून वृध्दापकाळातील आधारवड गेल्याने आईने एकच आक्रोश केला. मृतक अरूण कांबळे याचे गेल्यावर्षी लग्न झाले असून त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ, बहिण आहे. कुंकवाचा धनी गेल्याने पत्नीच्या आक्रोशाने उपस्थितांची मने हेलावली. कांबळे कुटुंबावर जणू आभाळच कोसळले. मृतक राजू कांबळे याच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ व विवाहित बहीण आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबियांनी टाहो फोडला.

मृतक प्रवीण कांबळे याच्या पश्चात पत्नी, तीन वर्षाचा मुलगा, आई, भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. वाजंत्रीचे काम करून प्रवीण हा कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत होता. पत्नी व 3 वर्षीय चिमुकल्याचे छत्र हरविल्याने कुटुंब पोरके झाले. मृतक गणेश बांगरे याच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई , वडील, दोन भाऊ आहेत. मृतक गणेशची लहान मुलगी 6 महिने वयाची असून, घरातील कर्ता पुरुष गेल्याने उदरनिर्वाहाचा गहण प्रश्न निर्माण झाला. अपघाती निधनाची वार्ता भर जहागीर व शिरपूर येथे धडकताच गावावर शोककळा पसरली. पाच कुटुंबियांच्या आक्रोशाने आसमंत भेदून गेला. दरम्यान या दुर्देवी घटनेतील अन्य आठ जखमीवर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Post a Comment

0 Comments