अमरावती // जिल्ह्यातल्या मेळघाटातील साद्राबाडी या गावात मंगळवार आणि बुधवारच्या रात्री २.३० ते सकाळी ९ वाजेपर्यंत भूकंपाचे तब्बल १८ धक्के बसले. या धक्क्यांची तीव्रता इतकी अधिक होती की, प्राथमिक आरोग्य केंद्रालगतच्या एका घराला तडे गेले. त्याशिवाय आणखी एक घर कोसळले. वारंवार होऊ लागलेल्या या धरणीकंपामुळे मेळघातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. भुकंपाच्या घटनेची दखल जिल्हा प्रशासनाने योग्य त्या गांभीर्याने घेतली नसल्याची तक्रार नागरिकांची आहे.
मेळघाटातील धारणी तालुक्यातील तापीनदीलगत असलेल्या साद्राबाडी या परिसरात १७ आॅगस्ट रोजी भूकंपाचा पहिला धक्का बसला. त्याची तीव्रता कमी होती . २१ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के पुन्हा जाणवले. सदर भुकंपाची तीव्रता पूर्वीच्या तुलनेत अधिक होती. सदर घटनेनंतर १५ तासांनी पुन्हा मध्यरात्री अडीच वाजतापासून धरणीकंप सुरू झाले. सकाळपर्यंत भूकंपाचे एकूण १८ धक्के जाणवले. या धक्क्यांची तीव्रता सर्वाधिक होती. प्राथमिक आरोग्य केंद्रालगतच्या प्रदीप सोनी यांच्या घराच्या भिंतीला तडे जाऊन अर्धे घर कोसळले. उपविभागीय अधिकारी राहुल कार्डिले आणि अधिनिस्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी बुधवारी साद्राबाडी गावाला भेट दिली.



0 Comments