परळी (प्रतिनिधी ) मराठा क्रांती ठोक मोर्चा ठिय्या आंदोलनाचा आज ११ वा दिवस आहे. शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत दोन दिवसातच निर्णय घ्यावा, असे वक्तव्य मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी परळीत केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळेच राज्यभरात हे आंदोनलन पेटले असल्याचा आरोपही त्यांनी केला. यामुळे या आंदोलनादरम्यान झालेल्या मालमत्तेच्या नुकसानाची भरपाईही मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडूनच घ्यावी, असे पाटील यांनी म्हटले आहे. इतरत्र होत असलेल्या पत्रकार परिषद आणि बैठका यांचा परळीच्या आंदोलनाशी काहीही संबंध नाही, अशी माहितीही त्यांनी यावेळी बोलतांना दिली.
येत्या दोन दिवसांत मराठा क्रांती मोर्च्याच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय न झाल्यास या ठिय्या आंदोलनाचे रूपांतर तीव्र आंदोलनात होईल, असा इशारा परळीतील आंदोलकांनी शनिवारी पत्रकार परिषदे घेऊन दिला. यामध्ये जेलभरो आंदोलन, प्रशासकीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनासारखे तीव्र आंदोलने करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. राज्यातील सर्व आंदोलने परवानग्या घेऊन केलेले आहेत. या आंदोलनांना बदनाम करणाऱ्या शक्ती सक्रिय झाल्या असून यामागे कोण आहेत याचा पोलिसांनी शोध घ्यावा. आम्ही कुठल्याही खाजगी किंवा शासकीय मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतलेली आहे.
आंदोलकांवर झालेले गुन्हे तात्काळ मागे नाही घेतल्यास आणि आंदोलकांच्या मागण्या येत्या दोन दिवसात मान्य न झाल्यास १ ऑगस्ट पासून हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनाची ठिणगी देशात पडलेली आहे. परळीच्या आंदोलकांना जोपर्यंत सरकारचा निर्णय कळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन कुठल्याही परिस्थितीत मागे घेतले जाणार नसल्याचे आबासाहेब पाटील यांनी सांगितले. राज्य सरकारने एका शिष्ट मंडळाद्वारे परळीत जनता दरबारातच येऊनच निर्णय घ्यावा, आंदोलन निर्णायक स्थितीत आल्याने काही लोक याला वेगळे वळण देण्यासाठी सक्रिय झाले आहेत. या आंदोलनाचा केंद्रबिंदु परळी असल्याने जो शासनाचा निर्णय असेल तो परळीच्या मराठा क्रांती ठोक मोर्चातच घ्यावा, असे पाटील यांनी बोलतांना सांगितले.


0 Comments