Header Ads Widget

Responsive Advertisement

औरंगाबाद प्रदेशातील एसटीचे आतापर्यंत ३५ लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.तर एसटी महामंडळाचे ८६ लाखांचे नुकसान.


मराठा आरक्षणाच्या आंदोलनात  एकूण २४८ एसटी बस गाडय़ांचे नुकसान झाल्याची माहिती
मुंबई- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाकडून १८ जुलैपासून राज्यात आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात एसटीला मोठी झळ बसली असून बुधवारपर्यंत एकूण २४८ एसटी बस गाडय़ांचे नुकसान झाल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. बुधवारीही झालेल्या आंदोलनामुळे मुंबईसह राज्यातील एकूण ५६ आगार हे पुर्ण बंद ठेवण्यात आले.

आतापर्यंत २४८ एसटी बस गाडय़ा आंदोलनकर्त्यांनी फोडल्या असून यामध्ये पाच बस गाडय़ा जाळण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाला आंदोलनाची सर्वात मोठी झळ ही औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी या औरंगाबाद प्रदेशात बसली आहे. या भागांत आंदोलन अधिक तीव्र होतानाच अनेक बस गाडय़ांचे नुकसान करण्यात आले. औरंगाबाद प्रदेशातील एसटीचे आतापर्यंत ३५ लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. त्याखालोखाल नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर येथेही अनेक एसटी बस गाडय़ांची तोडफोड व जाळपोळ करण्यात आली आहे. बस गाडय़ा आगारांतून बाहेरच पडत नसल्याने एसटी प्रवाशांचे हाल होत आहेत. राज्यातील एसटीची लांब पल्ल्याच्या मार्गावरील व त्याचबरोबर ग्रामीण सेवाही पूर्णपणे कोलमडली आहे.

बुधवारी राज्यातील अनेक भागांत १८ जुलैपासून आंदोलन सुरू असतानाच २५ जुलै रोजी मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह रायगड भागातही बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे या भागातील एसटी सेवा पूर्णपणे कोलमडली. राज्यातील २५० आगारांपैकी ५६ आगार हे १०० टक्के बंद ठेवण्यात आले.

मुंबईतील बस आगारांत आलेले प्रवासी तर तासंन्तास ताटकळत बसले होते. सायंकाळनंतर बस सेवा सुरू होईल, अशी माहिती प्रवाशांना एसटीकडून देण्यात येत होती. त्यामुळे एक किंवा दोन तासांनी बस सुरू होईल या आशेने प्रवासी एसटी आगारांतच ठाण मांडून बसल्याचे चित्र होते.

मुंबई सेन्ट्रल, कुर्ला नेहरूनगर, परळ, पनवेल व पालघरच्या एका आगारातील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. तर पालघरमधील सात, रायगडमधील आठ, ठाणे विगातील छोटय़ा-मोठय़ा आठ आगारांतील बस वाहतूक ही अंशत: बंद ठेवण्यात आली होती.

नागरिकांना त्रास

बुधवारी मुंबई सेन्ट्रल आगारात काही प्रवासी हे बस गाडी सुरू होण्याची तीन ते चार तास वाट पाहात होते. काही प्रवासी सकाळी नऊ वाजल्यापासूनच आले होते. यातील पवई येथे राहणा-या प्रतीक्षा दांडेकर श्रीवर्धनला जाण्यासाठी मुंबई सेन्ट्रल आगारात सकाळी अकरा वाजल्यापासूनच होत्या. आजीचे निधन झाल्याची माहिती दांडेकर यांना सकाळी आठ वाजता मिळताच त्या तात्काळ घरातून निघाल्या व मुंबई सेन्ट्रल आगार गाठले. मात्र दोन ते अडीच तास वाट पाहूनही त्यांना या आगारातून एसटी उपलब्ध झाली नाही.

Post a Comment

0 Comments