Header Ads Widget

Responsive Advertisement

_ *" कितीही चमकलं तरी* *कलईची चांदी होत नाही* *अन् चरख्या शेजारी* *फोटो छापला म्हणून* *कोणी गांधीजी होत नाही ''*


परळीत आ.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त रंगले महाकवी संमेलन !
परळीकरांनी अनुभवली  काव्यप्रतिभा

परळी वैजनाथ /प्रतिनिधी....
        माजी उपमुख्यमंत्री तथा विधिमंडळ गटनेते आ.अजितदादा पवार व विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध सामाजिक आणी लोकोपयोगी उपक्रमांच्या  'आधार महोत्सवाचे' आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले होते.22 जुलै रोजी  आ.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील नामवंत कवींचे महाकवीसंमेलन रंगतदार झाले.   रसिकश्रोत्यांनी  या निमित्ताने प्रत्यक्ष काव्यप्रतिभा अनुभवली.
         आधार महोत्सवानिमित्त आयोजित निमंत्रितांच्या महाकविसंमेलनात वैविध्यपूर्ण व वाङ्मयीन परिपूर्ण गुणांनी सादर केलेल्या दमदार कवितांनी परळीकर रसिक मंत्रमुग्ध झाले . त्यात पुण्याहून आलेले कवी सारंगनिल ऊर्फ 'झिंगाट ' फेम अनिल दीक्षित यांनी _
     *"हे उरात होतंय धडधड*
       *बंदी नोटावर आली*
   *अन् हजार पाचशे बदलून घ्या*
        *मोदीची आज्ञा झाली ."*
    हे नोटाबंदीवरील विडंबन व 'जीएसटी ' वरील विडंबनात्मक कविता सादर करून रसिकांना खळखळून हसवले .
नांदेडच्या नारायण पुरी यांच्या कवितेने तर हास्य रसाचा कळसच केला . त्यांच्या ' *प्रेमाचा जांगडगुत्ता ग..!'* या कवितेत प्रणयातील शृंगार रसाविष्कारासोबतच राजकीय भाष्य याचा सुरेख संगम साधलेला होता . त्यांच्या _
      *'हिचा काटा*
        *तुह्या पायातली सल*
        *त्यात महा निमा वाटा*
        *पाय नाजुकसाजुक*
        *राणी कापसाच्यावाणी*
        *तुझ्या पायाला भुलली*
          *काट्याची गं आणी ''*
या कवितेने तर कविसंमेलनात उत्साह भरला , रंगत आणली .
 सोलापूरच्याअंकुश अरेकर यांनी त्यांच्या *'बोचलं म्हणून ... '* या कवितेतून
         *अहो विकला असेल चहा*
          *म्हणून*
       *देश विकायचा असतो का ? '*
असा थेट सवालच उपस्थित केला . इतकेच काय तर-
*''पंतप्रधानपदाचा नाही तर*
*माणुसकीचा राजीनामा*
*द्यावा लागेल ."*
    असे आव्हान कवितेच्या माध्यमातून केले . त्यांनी सादर केलेल्या 'लालू ' व ' प्रेम ' या कवितांनाही रसिकांनी भरभरून दाद दिली .
नाशिकहून आलेल्या संदीप जगताप यांनी सादर केलेल्या 'इन्स्पेक्शन ' व इतर कवितांनी वास्तवानुभूतीचा प्रत्यय दिला .
कवी अरुण पवार यांनी *'जशोदाबेन की मन की बात'* *'लावणी*' रचनेबरोबरच त्यांची प्रसिद्ध असलेली *'वाटणी '* कविता यावेळी सादर केली . त्यांच्या 'वाटणी ' या कवितेतील -
        *'वायली ऱ्हायली मुलं*
          *ऱ्हायली वायली मुलं*
             *दोघांची वाटणी*
           *माय परसात अन्*
          *बाप गोट्याचा धनी ''*
या ओळींनी रसिक श्रोत्यांच्या डोळ्यात टचकन पाणी उभे राहिले .माणसातील असंवेदनशीलतेलाच या कवितेने आव्हान दिले .
  कविसंमेलनाचे दमदार सूत्रसंचालन करणाऱ्या भरत
दौंडकर यांनी _
       *" कितीही चमकलं तरी*
           *कलईची चांदी होत नाही*
          *अन् चरख्या शेजारी*
          *फोटो छापला म्हणून*
         *कोणी गांधीजी होत नाही ''*
        या कवितेबरोबरच त्यांची ' गुंठा गुंठा ' ही प्रसिद्ध कविताही सादर केली . दोन तासापेक्षा जास्त वेळ चाललेल्या या कविसंमेलनात शृंगार , हास्य , करुण आदी रसांची प्रचीती परळीकर रसिकांना आली .
        प्रास्ताविक बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले.मान्यवर कवींचा परिचय प्रा.राजकुमार येल्लावाड यांनी करून दिला. सूत्र संचलन प्रा.डॉ.विनोद जगतकर यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, सदस्य यांनी परिश्रम घेतले.
      

Post a Comment

0 Comments